इतका सगळा इचलकरंजी मध्ये पाण्याचा प्रश्न असून सुद्धा पाण्याचे नियोजन नीट होते अश्यातला भाग नाही. नदीचे पाणी पुरत नसल्यामुळे सरकार ने गल्लोगल्ली कूपनलिका काढून दिल्या आहेत. परंतु त्यावर हातपंप फारच थोड्या ठिकाणी. बाकीच्यांवर विजेचा पम्प. त्या चे बटण सुरु करायला आणि बंद करायला रोज सकाळी एक माणूस ठराविक वेळी येणार आणि २ तासांनी बंद करून जाणार. या कूपनलिकांवर ज्या तोट्या दिल्या आहेत त्याला बंद करायला कॉक नाही. म्हणजे जर कोणालाच २ तासामध्ये काही वेळ पाणी नको असेल तर ते तसेच वाहत राहणार कारण बंद करण्याची सोयच नाही. मग २ तास मोठ्या फोर्स ने पाणी वाहून जात असते. उन्हाळ्यात २ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा या सार्वजनिक कूपनलिकांवर गर्दी असते पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फारसे लोक इकडे फिरकत नाहीत. पण या कूपनलिकामधून रोज २ तास नियमित पणे उपसा सुरूच.
मग या कूपनलिका उन्हाळ्यामध्ये आटतात. पाणी कमी येते किंवा काही नलिका ना येताच नाही. बरीचजण या कूपनलिकेचे connection चोरून घरात घेतात. एका कूपनलिकेवर २-३ गल्ल्यामध्ये नळ दिले आहेत. मग मधेच असे कोणी चोरून connection घेतले असेल तर पाणी बाकीच्या नळाला येत नाही. मग दूर पर्यंत पाणी आणण्यासाठी जावे लागते.
माझ्याच घराच्या समोरील कूपनलिकेचे पाणी उन्हाळ्यात या चोरट्या connections मुळे गेले होते. गल्लीतील बाकीच्या बहुतांशी घरामध्ये माझ्या घरासारखे पाण्याचा मोठा साठा करण्याची सोय नाही. या घरातील बायकांनी नागरपालिकांवर मोर्चा काढून चोरटी connections बंद करायला लावली. याहून गरीब घरातल्या बायकांचे पाण्याचे हाल विचारूच नका. मुख्यतः घरातील बायकांचे आणि शालेय मुलीचे. याच दिवसात शाळेत परीक्षांची धामधूम चालू असते. बऱ्याच मुली सकाळी घरातील पाणी भरून मग परीक्षेला जातात अगदी १०/१२ च्या बोर्ड परीक्षेला सुद्धा.
बहुदा सर्व श्रीमंत लोकांनी स्वतःच्या कूपनलिका काढल्या आहेत आणि पाण्याच्या मोठ्या साठ्याची सोय केली आहे. पण त्या सुद्धा कूपनलिकाची मोठी संख्या झाल्यामुळे उन्हाळ्यात आटतात. मग टँकर मागवला जातो. बर्याचश्या उच्च माध्यमिक लोकांच्या सोसायटी मध्ये उन्हाळ्यात टँकर मागवला जातो. सर्व सोसायटी मध्ये पाण्याच्या मोठ्या साठ्याची सोय करावी लागते.
आता कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पण आणल्यामुळे त्रास काही भागात तरी कमी झाला आहे. पण इचलकरंजी पासून फक्त ३० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मिरजेचे पाणी ऐन उन्हाळ्यामध्ये लातूर पर्यंत पोचू शकते पण इचलकरंजी मात्र अजून टँकरमुक्त नाही. म्हणजे पाण्याचे नियोजन/व्यवस्थापन नीट करू शकत नाही आहोत आपण आज २०१७ मध्ये सुद्धा.
No comments:
Post a Comment